ब्रिटीश शासनात
जन्मलेला एक भक्कम
काळ्या दगडांचा
तो क्षिप्रेवरचा जूना पूल...
दात पडून
गालावर पडलेले खड्डे
हसताना
तो आता लपवत नाही
वार्धक्यामुळे
पडलेल्या सुरकुत्याही
अकारण चिंता करुन
ताणत नाही...
तो उगवणारा दिनमणी
संथपणे वाहणारी नदी
अस्तंगत असलेला भास्कर
समोरच्या पूलावरुन
निरर्थक सकाळ ते संध्याकाळ
धावणारे जीवन
खुणवणारा
तो क्षिप्रेवरचा जूना पूल
पथिकांकडे टोल
मागत नाही...
एकेकाळी तोही नि:श्रांत धावत
असणारा
आता शांत उभा
त्याला कटवून जाणाऱ्या
नातलगांची तमा
बाळगत नाही...
जमीनदोस्त होण्या आधी
जमीनीवर पडून
पायाच्या पंज्यावरती
नातवाला बसवून
ठो दे ठो दे म्हणत
त्या टोकापासून ह्या टोकाला
नेणारा
तो क्षिप्रेवरचा जूना पूल
क्षिप्रामाई जवळ
आता गाऱ्हाणे गात नाही...
कारण
हे उत्तरायण संपता
अलगद सामावून घेइल
कुशीत त्याला
क्षिप्रामाई
पोटच्या पोरा सारखं
आपच
तो क्षिप्रेवरचा जूना पूल
आनंद लूटत लूटवत
आता कसले ही फड ठेवत नाही....
...........चेतन पद्माकर फडणीस, देवास, १७.२.२०१६
No comments:
Post a Comment